कोरपना येथे होणार ईद-ए-मिलाद निमित्त भव्य रॅली; आमदार स्वतः उपस्थित राहणार
कोरपना एक्सप्रेस वृत्तसेवा, कोरपना: उद्या दि. 06/09/2025 कोरपना येथे ईद-ए-मिलादच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शांतता आणि सलोख्याचा संदेश देणार आहेत. या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभणार आहे ती म्हणजे आमदार देवराव भोंगळे यांची.
ही रॅली सकाळी 8 वाजता जामा मस्जिद येथून सुरू होईल आणि अनेक वार्डातून फिरत परत जामा मस्जिद येथे समाप्त होईल. रॅली दरम्यान, इस्लाम धर्मातील पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) यांच्या जीवनकार्याची आणि शिकवणींची माहिती दिली जाईल.
या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी “रजा एक्शन कमिटी कोरपना” चे अनेक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. त्यांनी सांगितले की, “हा उत्सव केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून, तो प्रेम, एकता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देणारा आहे. आमदार महोदयांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.”
आमदार देवराव भोंगळे यांनी या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, “ईद-ए-मिलाद हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या रॅलीमध्ये सहभागी होऊन मी शांतता आणि एकजुटीच्या संदेशाला पाठिंबा देणार आहे. सर्व नागरिकांना माझ्याकडून ईद-ए-मिलादच्या खूप खूप शुभेच्छा.”
या रॅलीमुळे शहरात वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.






