रस्ता चकाचक, पण एसटी मिळेना! राजुरा डेपोच्या भूमिकेमुळे वणी मार्गावरील प्रवासी ‘वेटिंग’वर
राजुरा: राजुरा ते वणी या मार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण होऊन आता हा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय सुलभ झाला आहे. मात्र, रस्ता दुरुस्त होऊनही राजुरा बस डेपोने या मार्गावर अद्याप एकही बस सुरू केलेली नाही. “या मार्गावर उत्पन्न मिळत नाही,” असे अजब तर्क डेपो मॅनेजरकडून दिले जात असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता खड्डेमय असल्याने बस फेऱ्या बंद होत्या. आता रस्ता गुळगुळीत आणि सुस्थितीत झाला आहे.
वणी येथे कामासाठी, शिक्षणासाठी आणि उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
प्रशासनाचे उत्तर: प्रवाशांनी बस सुरू करण्याची मागणी केली असता, डेपो मॅनेजरने “उत्पन्न मिळत नाही” असे सांगून हात झटकले आहेत.
”रस्ता खराब होता तेव्हा बस येत नव्हती, हे समजू शकले असते. पण आता रस्ता चांगला असतानाही डेपो केवळ उत्पन्नाचे कारण पुढे करत आहे. मग सामान्य नागरिकांनी जायचे कुठे?”— त्रस्त प्रवासी,
उत्पन्नाचा विचार करण्याआधी एसटी प्रशासनाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याचे भान ठेवावे. या मार्गावर तात्काळ बस फेऱ्या सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.






