कोरपना पोलिसांची मोठी कारवाई; पाठलाग करून सुगंधी तंबाखूचा साठा जप्त, ४.५४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कोरपना (चंद्रपूर): जिल्ह्यामध्ये बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या तस्करीविरोधात कोरपना पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. एका पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा कारमधून होणारी अवैध वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली. या कारवाईत ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी इस्तियाज किडीया (रा. गडचांदूर) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.
दिनांक १० मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास कोरपना पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंगवर असताना, मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, पारडीकडून एक पांढऱ्या रंगाची ब्रिझा कार सुगंधी तंबाखू घेऊन कोरपनाकडे येत आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती वाडिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बस स्टॉप चौक, कोरपना येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कार (क्र. MH-34-BF-3413) येताना दिसली. पोलिसांनी इशारा करूनही चालकाने वाहन थांबवले नाही आणि वणी रोडच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ खाजगी वाहनाने पाठलाग केला. स्टेला मॉरिस स्कूलकडे जाणाऱ्या मार्गावर आरोपीने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पळून गेलेला इसम गडचांदूर येथील इस्तियाज किडीया असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल आढळून आला:
विमल पान मसाला: २०० नग (६० ग्रॅमचे पाकीट), किंमत २४,००० रुपये.
पान पराग पान मसाला: १२० लहान बॉक्स (१०० ग्रॅमचा बॉक्स), किंमत ३०,००० रुपये.
ब्रिझा कार: जुनी वापरती पांढऱ्या रंगाची कार, किंमत ४,००,००० रुपये.
एकूण जप्त मुद्देमाल: ४,५४,००० रुपये.
या प्रकरणी ना.पो.शि. रामदास सुभाष आडे यांच्या तक्रारीवरून आरोपी इस्तियाज किडीया विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३०(२), २६(२)(अ), ५९(१), ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पो.नि. श्रीमती वाडिवे पो.उप.नि. देवानंद केकन, ना.पो.शि. रामदास आडे, पो.शि. किशोर रिंगोले , पो.शि. सटवा नामपल्ले व सहकाऱ्यांनी केली आहे. 






