कोरपना मजूर मृत्यू प्रकरण: पीएम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर; गळ्याच्या नसा तुटल्याने हत्येचा संशय बळावला!
पोलिस प्रशासन सुस्त की कोणाचे संरक्षण? संतप्त नागरिकांचा सवाल
कोरपना: तांबाडी फाट्यावरील महावितरणच्या कंत्राटी मजुराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. मृत कोला बलरामुडू यांच्या शवविच्छेदन (PM) अहवालाबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. मजुराच्या गळ्याच्या नसा तुटल्या असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत असून, हा केवळ अपघात नसून क्रूर हत्या असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
गळ्याला फास की जीवघेणी मारहाण?
दिनांक २० फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत सुरुवातीला कंपनीचा निष्काळजीपणा समोर आला होता. मात्र, आता शवविच्छेदन अहवालातील चर्चेनुसार, मृताच्या गळ्याला गंभीर इजा झाली असून आतील नसा तुटल्याचे समजते. स्थानिक प्रत्यक्षदर्शी महिलांनी आधीच दावा केला होता की, इतर मजुरांनी बलरामुडू यांना बांधून मारहाण केली होती. गळ्याच्या नसा तुटणे हे गळा आवळल्याचे किंवा अत्यंत भीषण मारहाणीचे लक्षण असल्याने हे प्रकरण आता थेट हत्येच्या (कलम ३०२) (१०३) BNS दिशेने सरकताना दिसत आहे.
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह?
इतकी गंभीर बाब समोर येऊनही आणि घटनेला वेळ उलटूनही पोलीस प्रशासनाने अद्याप संबंधित ठेकेदार किंवा संशयित ४-५ मजुरांवर कठोर कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मुख्य आरोपी फरार होण्याची भीती: कारवाईत उशीर होत असल्याने संशयित मजूर पसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीचे मौन: ज्या कंपनीकडे हे मजूर कामाला होते, त्या कंपनीचे प्रशासन अद्यापही माहिती लपवत असून पोलिसांवर दबाव तर नाही ना, अशी शंका नागरिकांकडून घेतली जात आहे.
आंध्र प्रदेशातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मजुराचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत आणि संबंधित कंपनीवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
”पोस्टमार्टममध्ये गळ्याच्या नसा तुटल्याची चर्चा जर खरी असेल, तर हा सरळ सरळ खून आहे. पोलीस नेमकी कशाची वाट पाहत आहेत? गरिबाच्या मरणाची किंमत काहीच नाही का?”
”मृतदेहाच्या गळ्यावर असलेल्या खुणा आणि नसांना झालेली इजा हे सूचित करते की ही घटना साधी नाही. पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून सत्य समोर आणायला हवे.” >
— स्थानिक नागरिक,






