प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली; कोरपणा तालुक्यातील गॅस वितरकांची आढावा बैठकीला दांडी!
कोरपना: जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई आणि घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या आढावा बैठकीला तालुक्यातील एकाही गॅस सिलेंडर विक्रेत्याने उपस्थिती न दर्शवल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय आदेशाला थेट हरताळ फासणाऱ्या या विक्रेत्यांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र शासनाच्या दि. ९ मार्च २०२६ रोजीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि वाढत्या इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे, घरगुती गॅसचे वितरण सुरळीत राहावे व अवैध विक्रीला आळा बसावा, यासाठी तहसीलदार कोरपणा यांनी आज दि. २७ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व गॅस वितरकांना लाभार्थी यादी, साठा (Stock), आवक आणि वितरण या सर्व माहितीसह उपस्थित राहण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र, एकही गॅस विक्रेता या बैठकीला हजर राहिला नाही.
प्रशासनाचा इशारा आणि गांभीर्य
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर किंवा ‘ब्लॅक मार्केटिंग’ वाढण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तहसीलदारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, बैठकीला गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पेट्रोल पंप चालकांची उपस्थिती: एकीकडे गॅस विक्रेत्यांनी पाठ फिरवली असली, तरी पेट्रोल पंप चालक आणि मालकांनी डिझेल-पेट्रोलच्या साठ्याची माहिती घेऊन प्रशासनाला सहकार्य केल्याचे समजते. मात्र, गॅस वितरकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्यांना मिळणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
”शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि बैठकीला दांडी मारणाऱ्या गॅस वितरकांची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर यांना सादर करण्यात आली असून, त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे.”
— तहसील कार्यालय, कोरपना






