कमिशनखोरीमुळेच बोगस कामे? पिंपळगाव–नांदा रस्ता दुरुस्तीतील निकृष्ट दर्जावर ग्रामस्थ आक्रमक!
पूर्वीच्या बोगस कामातूनही ‘जि.प. बांधकाम’ धडा घेईना; अभियंत्यांच्या मूकसंमतीमुळे कंत्राटदारांचे फावले?
नांदा फाटा: कोरपना तालुक्यातील पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात पुन्हा एकदा अत्यंत निकृष्ट दर्जाचा कारभार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी याच मार्गावरील कामांमध्ये झालेल्या कथित बोगसपणातून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. उलट, विभागीय अभियंत्यांच्या मूक पाठबळामुळेच कंत्राटदारांकडून अशी निकृष्ट कामे रेटली जात असल्याचा थेट आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वर्षभरातच पुलाचा रपटा उखडला!
मिळालेल्या माहितीनुसार, बोरकुटे यांच्या शेताजवळ सुमारे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छोट्या पुलावरील सिमेंट काँक्रीटचा रपटा अवघ्या एका वर्षातच पूर्णतः उखडून गेला आहे. नव्याने बांधलेल्या कामाची एवढ्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था ही कंत्राटदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. जनतेच्या करातून जमा झालेल्या सार्वजनिक निधीची अशा प्रकारे उधळपट्टी होत असेल, तर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी नेमके काय केले? असा तिखट सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
माती आणि गवतावरच टाकला मुरूम-गिट्टीचा थर!
दरम्यान, पिंपळगाव–गडचांदूर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या कामात तर कंत्राटदाराचा उद्दामपणा पराकोटीला पोहोचला होता. रस्त्यावरील गवत आणि माती न काढता, कोणतीही साफसफाई न करता थेट त्यावरच गिट्टी टाकून रस्ता तयार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पिंपळगाव येथील जागरूक नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप घेत तक्रार केल्यानंतर, कंत्राटदाराला कामात काही प्रमाणात दुरुस्ती करावी लागली. मात्र, सुरुवातीपासूनच काम थातुरमातुर आणि निकृष्ट दर्जाचे करण्याचा प्रयत्न झाल्याने कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यावर संशय अधिक गडद झाला आहे.
”कमिशनच्या हव्यासापोटी जनतेच्या जिवाशी खेळ”
विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी आणि संगनमत असल्याशिवाय अशा प्रकारचे निकृष्ट काम वारंवार होणे शक्यच नाही, अशी जाहीर चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे. “वरकमाई आणि कमिशनमुळेच ही बोगस कामे पोसली जात आहेत का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
उच्चस्तरीय चौकशीसह ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासण्यात यावा, दोषी कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच कोरपना येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील संबंधित अभियंता आणि कामावर देखरेख ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
आता करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांवर खरोखरच कारवाई होणार की नेहमीप्रमाणे ‘चौकशीच्या नावाखाली’ हे प्रकरण दडपले जाणार? याकडे संपूर्ण कोरपना तालुक्याचे लक्ष लागले आहे.
”रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये कुठलीही साफसफाई न करता चक्क मातीवरच गिट्टी टाकून काम सुरू आहे. अशा बोगस कामांमुळे हा रस्ता अल्पावधीतच पुन्हा उखडणार यात शंका नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक करू नये.”
— पंकज लिहितकर, नागरिक, नांदा.





