कोरपणातील CCI प्रकरण दिल्ली दरबारी!
कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सुभाषभाऊ धोटे आक्रमक; केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेणार
राजुरा : कोरपणा तालुक्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) कापूस खरेदी प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या कथित गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपांनी आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कापसाच्या खरेदीत गैरप्रकार झाला असेल, तर दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये,” अशी ठाम भूमिका धोटे यांनी घेतली आहे.
CCI ही केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील कापूस खरेदी व्यवस्थेतील महत्त्वाची संस्था आहे. किमान आधारभूत किंमत (MSP) व्यवस्थेअंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करताना पारदर्शकता, योग्य मोजमाप, योग्य दर आणि वेळेवर मोबदला मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरपणा तालुक्यातील CCI खरेदी प्रक्रियेबाबत झालेल्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे धोटे यांचे म्हणणे आहे.
दिल्लीमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट
या प्रकरणाला आता थेट दिल्लीच्या दरबारात नेण्याचा निर्णय सुभाषभाऊ धोटे यांनी घेतला आहे. संबंधित कागदपत्रे, शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेऊन कोरपणातील CCI कापूस खरेदी प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे चौकशी करून चौकशीत अनियमितता अथवा गैरप्रकार आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहणार
शेतकरी हा कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याने वर्षभर मेहनत करून पिकवलेल्या कापसाच्या विक्रीतच जर अन्याय किंवा गैरप्रकाराचा संशय निर्माण होत असेल, तर त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न सातत्याने लावून धरू, अशी आक्रमक भूमिका सुभाष धोटे यांनी घेतली आहे.
कोरपणा तालुक्यातील CCI खरेदी प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी आता केंद्र सरकारच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असून, धोटे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या प्रकरणाला नेमके कोणते वळण मिळते, याकडे शेतकरी, कापूस उत्पादक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




