चंद्रपूर जिल्ह्यात तळीरामांवर पोलिसांचा दणका; ४ दिवसांत ४८९ वाहन चालकांवर कारवाई
चंद्रपूर: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली आहे. दि. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४८९ वाहन चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईचा तपशील:
नववर्षाच्या जल्लोषात रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने दोन विभागांमार्फत ही कारवाई करण्यात आली:
👉 वाहतूक नियंत्रण शाखा: ११४ केसेस
👉 जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन: ३७५ केसेस
👉 एकूण कारवाई: ४८९ चालक
अपघात रोखण्यासाठी कडक पावले ३१ डिसेंबरच्या रात्री होणारी गर्दी आणि मद्यधुंद अवस्थेत होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करून तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या ४८९ चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, उत्सव साजरा करताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकू नका. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा.




