१६ वर्षांनंतर जुळल्या आठवणींच्या तारा; दगडोजीराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
कोरपना: आदर्श ग्राम विकास सेवा मंडळ द्वारा संचालित दगडोजीराव देशमुख विद्यालय, कढोली (खु.) येथे सन २००९-२०१० सत्रातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी आपल्या परिवारासह शालेय मैदानात एकत्र आले होते.
जुन्या आठवणींना उजाळा आणि कौटुंबिक संवाद
या कार्यक्रमात १० वीच्या बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी सर्वांनी स्वतःचा परिचय, कौटुंबिक प्रगती आणि आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी दिलखुलास चर्चा केली.
मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा
संस्थेचे अध्यक्ष आबिद अली यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “अशा स्नेहसंमेलनांमुळे जुन्या आठवणी जिवंत राहतात आणि एकमेकांपासून प्रेरणा घेण्याची संधी मिळते,” असे म्हणत त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक प्रकाश राऊत, बिलोरिया मॅडम, सायरे, माहुरे तसेच माजी विद्यार्थी बंडू वडस्कर, गणेश दहीवलकर, दयाल बोढे, दिनेश क्षीरसागर, निखिल बोंडे, अंकीता वसू, रूपाली चंदनकर, पपीता दरेकर, भाग्यश्री इटनकर आणि संगीता कुडसंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शाळेचे कर्मचारी नारायण अवताडे, मडावी, बाळा दरेकर यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा भेटण्याच्या ओढीने कार्यक्रमाची सांगता झाली.






