आरोग्य सेवेची २९ वर्षे: डॉ. राजुनंद गायकवाड यांचा गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात सपत्नीक गौरवपूर्ण निरोप!
अडीच दशकांहून अधिक काळ बालरोगतज्ज्ञ म्हणून अविरत सेवा; शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या अधिकाऱ्याची शासकीय सेवेतून निवृत्ती
कोरपना:
कोरपना आणि गडचांदूर परिसरात गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय अधीक्षक पदाचा यशस्वी कार्यभार सांभाळणारे आणि आरोग्य विभागात तब्बल २९ वर्षे, १० महिने व १० दिवस अविरत सेवा देणारे बालरोगतज्ज्ञ (वर्ग-१) डॉ. राजुनंद गायकवाड नुकतेच ३० जून २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे त्यांच्या सन्मानार्थ एका भव्य व भावूक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांचा त्यांच्या पत्नीसह ‘भारतीय संविधान’ व पेन देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
सिंदेवाही ते चंद्रपूर… असा राहिला यशस्वी सेवाप्रवास
डॉ. राजुनंद गायकवाड यांनी १९९६ मध्ये ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथून आपल्या वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चिमूर, वरोरा, राजुरा, कोरपना आणि चंद्रपूर अशा विविध शासकीय रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञ व प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला.
👉 १९९६ ते २०००: ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही
👉 २००० ते २००१: ग्रामीण रुग्णालय, चिमूर
👉 २००१ ते २००४: ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही (पुन्हा सेवा)
👉 २००४ ते २००९: उपजिल्हा रुग्णालय, वरोरा
👉 २००९ ते २०१४: ग्रामीण रुग्णालय, राजुरा
👉 २०१४ ते २०२३: ग्रामीण रुग्णालय, कोरपना
२०२३ ते २०२६: जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर (बढतीवर बालरोगतज्ज्ञ म्हणून नियुक्ती)
विशेष कार्यकाळ: चंद्रपूर येथे बदली झाल्यानंतर त्यांनी प्रतिनियुक्तीवर ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे अडीच वर्षे आणि ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे दीड वर्षे वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला. त्यांच्याच कार्यकाळात कोरपना व गडचांदूर रुग्णालयांचा कायापालट आणि विकास झाला.
कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेणारा ‘लोकप्रिय’ अधिकारी
आपल्या शांत, संयमी, आणि मनमिळावू स्वभावासाठी डॉ. गायकवाड संपूर्ण आरोग्य विभागात ओळखले जातात. उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य आणि कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन काम करून घेण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली. निरोपाच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. गायकवाड अत्यंत भाऊक झाले होते. “आरोग्य विभागात सेवा देताना आजवर मला सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले, मी सर्वांचा सदैव ऋणी राहीन,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सपत्नीक सत्कार आणि भेटवस्तूंचा वर्षाव
गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या निरोप समारंभाचे नेटके आयोजन केले होते. कार्यक्रमात डॉ. गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नीचा शाल, श्रीफळ, ‘भारतीय संविधान’ची प्रत आणि पेन देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत विविध भेटवस्तू प्रदान केल्या.
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती
या सोहळ्याला वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण येरमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम, डॉ. सोहेल शेख, डॉ. जाधव, डॉ. जुबेर, डॉ. मनीषा कन्नाके, डॉ. शहारे मॅडम, डॉ. रोहन निरंजने, डॉ. घुले प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच इन्चार्ज सिस्टर शिवानी कुंडले, मेघा कोरडे, मेघा चौरे, पूजा कोळी, विशाल ब्रदर, दक्षिणा सिस्टर, सयाम सिस्टर, पूजा सोनहिवरे, विशाल कडू, भूषण राऊत, रमेश राठोड, नागदेवते, शैलेश ठवरे, प्रिया मसुरे, सूरज चिमुरकर, शंकर लोणारे, शंकर चेडगूळवार, गोलू, आशिष, रेखा मावशी, प्रतीक्षा कदम यांच्यासह रुग्णालयातील इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






