कार्यकर्त्याशी जिव्हाळ्याचे नाते! आमदार देवराव दादा भोंगळे यांची थेट वडसा गाठत अबरार अली यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
विशेष बातमी :
राजकारणातील सततचे दौरे, बैठका आणि सार्वजनिक कार्यक्रमांची व्यस्तता सांभाळत असतानाही आपल्या कार्यकर्त्यांशी आपुलकीचा धागा जपणारे नेतृत्व म्हणून राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव दादा भोंगळे ओळखले जातात. याच आपुलकीचा प्रत्यय नुकताच आला, जेव्हा त्यांनी राजकीय व्यस्ततेतून वेळ काढत थेट वडसा येथे जाऊन कोरपना शहर भाजप महामंत्री अबरार अली यांच्या निवासस्थानी सदिच्छा व कौटुंबिक भेट दिली.
अबरार अली यांच्या पत्नी वडसा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याने अबरार अली काही दिवसांपासून तेथे वास्तव्यास होते. ही बाब समजताच आमदार भोंगळे यांनी कोणताही राजकीय कार्यक्रम नसताना केवळ आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्याची भेट घेण्याच्या उद्देशाने थेट वडसा गाठले.
अबरार अली, त्यांच्या पत्नी अश्फिया आणि मुलगा राहिश अली यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
कोणत्याही औपचारिकतेविना अत्यंत कौटुंबिक व जिव्हाळ्याच्या वातावरणात गप्पा रंगल्या.
लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता यापलीकडे जाऊन स्नेहाचे नाते जोपासल्याबद्दल उपस्थितांनी या कृतीचे कौतुक केले.
कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद
राजकारणात कार्यकर्ते हीच पक्षाचा मुख्य आधारस्तंभ असतात ही भावना जपणाऱ्या आमदार भोंगळे यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे अली कुटुंबीय आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. “नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते विश्वास आणि स्नेहावर उभे असते,” अशी भावना अबरार अली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
या प्रसंगी अमोल आसेकर, आशिष ताजणे, सतीश बेतावर आणि यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकप्रतिनिधीने दाखवलेल्या या तत्परतेचे आणि आपुलकीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.




