शिक्षणाचे मंदिर की मद्यसम्राट दिलीपचा अड्डा? नारंडामध्ये शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर अवैध दारू विक्री जोमात!
नारंडा: भविष्य घडवणाऱ्या ज्ञानमंदिराजवळच तरुणाई आणि शाळकरी मुलांचे भविष्य अंधारात लोटणारा अवैध दारूचा व्यवसाय जोमात सुरू असल्याचा संतापजनक प्रकार नारंडा येथे उघडकीस आला आहे. दिलीप नावाच्या व्यक्तीकडून हा अवैध दारूचा धंदा चालवला जात असल्याचा गंभीर आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या परिसरामध्येच मद्यपींचा सुळसुळाट वाढल्याने ग्रामस्थ आणि पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
शाळेच्या अगदी जवळच अवैध दारूची विक्री होत असल्याने आणि तिथे मद्यपींचा वावर वाढल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लहान मुलांच्या कोवळ्या मनावर या दुषित वातावरणाचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. शाळा सुरू असताना किंवा सुटण्याच्या वेळी परिसरात रेंगाळणारे मद्यपी विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहेत.
नागरिकांच्या थेट आरोपानुसार, दिलीप हा राजरोसपणे हा अवैध धंदा चालवत असूनही संबंधित प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या संशयास्पद मूकसंमतीमुळेच अवैध व्यवसायिकांचे धाडस दिवसेंदिवस वाढले असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
“दुकानदार किंवा धंदा चालवणारा दिलीप असो वा अन्य कोणी, शाळा परिसरातील हा अवैध धंदा तातडीने बंद झालाच पाहिजे. लवकरात लवकर कठोर कारवाई नाही झाल्यास पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा सज्जड दम संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.




