तहसीलदारानी ६० ब्रास वाळू जप्त केली, पण तस्कर मिळेना!
कोरपना (२७ जून २०२५): कोरपना तालुक्यातील तुळशी येथे वाळू तस्करांवर वचक बसवण्यात अद्याप यश आलेले नाही. नुकतीच एका कारवाईत तहसीलदार यांच्या पथकाने सुमारे ६० ब्रास वाळू जप्त केली आहे. मात्र, या कारवाईत वाळू उपसा करणारे किंवा तिची वाहतूक करणारे तस्कर हाती लागले नाहीत, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी तुळशी येथील साठवणूक केलेल्या ठिकाणी छापा टाकला. प्रशासनाचे पथक पोहोचण्यापूर्वीच वाळू तस्कर पसार झाले होते. घटनास्थळी ६० ब्रास वाळूचा मोठा साठा आढळून आला, जो प्रशासनाने जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाळूची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे अवैध वाळू उपसा आणि त्याची वाहतूक कशा पद्धतीने बिनबोभाट सुरू आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाच्या छाप्यांची माहिती तस्करांना आधीच मिळत असल्याने ते सहजासहजी हाती लागत नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
👉 पुढील तपास सुरू करण्याची नागरिकांची मागणी: जप्त करण्यात आलेल्या वाळू संदर्भात पंचनामा करण्यात आला असून, तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. जोपर्यंत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत, तोपर्यंत अवैध वाळू उपसा थांबणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
👉घरकुल लाभार्थ्यांना दिलासा: जप्त करण्यात आलेली ही 60 ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. यामुळे घरकुल बांधकामासाठी वाळूची आवश्यकता असलेल्या गरीब लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकरणातील मूळ तस्कर’ अजूनही मोकाट फिरत असून, त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
👉तहसीलदारांना आवाहन: या घटनेनंतर कोरपना परिसरातील नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी तहसीलदार कार्यालयाला तीव्र आवाहन केले आहे. केवळ वाळू जप्त न करता, त्यामागे असलेल्या मोठ्या वाळू तस्करांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळेच भविष्यात अशा अवैध धंद्यांना आळा बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
👉पुढील पाऊल काय? प्रशासनाने या प्रकरणात अधिक गंभीरतेने लक्ष घालून, वाळू तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करावे अशी अपेक्षा आहे. केवळ दिखाव्याची कारवाई न करता, मूळापासून हा अवैध व्यवसाय संपवण्यासाठी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तहसीलदार यावर काय भूमिका घेतात आणि पुढील काळात काय कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






