कोरपना-आदिलाबाद मार्गावर RTO चा ‘रॅपिड ॲक्शन’ मोड; १० दिवसांत ४० वाहनांवर गाजली वीज!
कोरपना: मागील दहा दिवसांपासून कोरपना ते आदिलाबाद या आंतरराज्य मार्गावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) तपासणीचा धडाका लावला आहे. या धडक कारवाईत आतापर्यंत १०० हून अधिक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईचा लेखाजोखा:
👉 एकूण तपासलेली वाहने: १००+
👉 दोषी वाहने: ४०
👉 आकारलेला दंड: ३ लाख ८६ हजार रुपये.
👉 वसूल केलेला सीमा कर (Tax): ४२ हजार रुपये (परराज्यातील वाहनांकडून)
बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून थकीत कर वसूल करण्यावरही पथकाने भर दिला आहे.
नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले: या मार्गावर ओव्हरलोडिंग, कागदपत्रांची पूर्तता नसणे आणि विनापरवाना वाहतूक वाढल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाने ही मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे, बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.
”ही कारवाई केवळ तात्पुरती नसून इथून पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. वाहनधारकांनी सर्व नियमांचे पालन करावे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.” — परिवहन विभाग अधिकारी






