धक्कादायक! पारडी आणि रूपापेठेत अवैध दारूचा महापूर; पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
कोरपण्यातील ‘त्या’ नवीन भट्टीने गाठली सीमा; ‘कोरपना एक्सप्रेस’ पुढील अंकात करणार विक्रेत्यांच्या नावांचा गौप्यस्फोट!
✍️ मोहब्बत खान/कोरपना
कोरपना: तालुक्यातील पारडी आणि रूपापेठ ही गावे सध्या अवैध देशी दारूच्या विळख्यात सापडली असून, या व्यवसायाने आता रौद्र रूप धारण केले आहे. गल्लीबोळांत मिळणाऱ्या या दारूमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र ‘धृतराष्ट्रा’ची भूमिका बजावत असल्याचा थेट आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
भट्टी नवी, धंदा जुना!: मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, कोरपना शहरात नव्याने सुरू झालेल्या एका देशी दारू भट्टीमधून या अवैध दारूचा मोठा पुरवठा केला जात आहे. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनांनी या दारूची खेप पारडी आणि रूपापेठ सारख्या ग्रामीण भागात पोहोचवली जाते. विशेष म्हणजे, हा सगळा व्यवहार पोलिसांच्या नाकाखाली सुरू असताना, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांचा थेट आरोप: “गावात शांतता राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांचे या विक्रेत्यांना अभय आहे का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. घरातील कर्ती पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. महिला भगिनींनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
साप्ताहिक कोरपना एक्सप्रेसचा इशारा!:आम्ही केवळ बातमी देऊन थांबणार नाही. पारडी, रूपापेठ आणि कोरपना परिसरातील जे ‘पांढरपेशी’ लोक या अवैध व्यवसायात सक्रिय आहेत, त्या विक्रेत्यांची आणि सप्लाय करणाऱ्यांची संपूर्ण यादी पुराव्यासह ‘साप्ताहिक कोरपना एक्सप्रेस’च्या पुढील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात येईल. प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा जनआक्रोश अटळ आहे.






