महसूल विभाग ‘कुंभकर्णी’ झोपेत; कोठोड्यात पहाटे ३ वाजल्यापासून विना ‘टीपी’ रेतीची लूट!
प्रशासनाच्या आशीर्वादाने रेती माफियांचे फावले; १०:३० ला येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोणाला फायदा?
कोरपना: कोठोडा रेती घाटावर सध्या महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत नियमांची ऐशीतैशी केली जात आहे. एकीकडे शासन महसूल वाढीसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे कोठोडा घाटावरून पहाटेपासूनच विना ‘टीपी’ (ट्रान्सपोर्ट परमिट) रेतीची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांवर यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे, ते निवांत १०:३० वाजता कर्तव्यावर हजर होतात. तोपर्यंत रेती माफिया आपले काम फत्ते करून मोकळे झालेले असतात.
पहाटे ३ ते सकाळी १०: खेळ सारा अंधारात मिळालेल्या माहितीनुसार, कोठोडा घाटावर रेती चोरीचा मुख्य खेळ पहाटे ३ वाजल्यापासून सुरू होतो. अंधाराचा फायदा घेत शेकडो गाड्या कोणत्याही रॉयल्टीशिवाय (टीपी) रेती भरून सुसाट धावत आहेत. पहाटेच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट असतो आणि महसूल विभागाची कोणतीही गस्त नसते, याचाच फायदा हे माफिया घेत आहेत.
कर्मचारी येतात तेव्हा घाट रिकामा! महसूल विभागाचे संबंधित कर्मचारी सकाळी १०:३० च्या सुमारास घाटावर किंवा तपासणी नाक्यावर पोहोचतात. मात्र, तोपर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरक्षित स्थळी पोहोचलेल्या असतात. कर्मचाऱ्यांच्या या ‘सोयीस्कर’ वेळेमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार निव्वळ हलगर्जीपणा आहे की महसूल विभागाचे या माफियांसोबत ‘साटेलोटे’ आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
वेळेचे गणित: पहाटे ३ वाजता वाहतूक सुरू, कर्मचारी १०:३० ला हजर.
महसूल बुडाला: विना टीपी वाहतुकीमुळे शासनाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान.
सुरक्षेचा प्रश्न: पहाटेच्या वेळी सुसाट धावणाऱ्या गाड्यांमुळे अपघाताची भीती.
प्रशासकीय कारवाई होणार का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कोठोडा घाटावर पहाटेच्या वेळी अचानक छापे टाकावेत आणि कुंभकर्णी झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






