‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान: आमदार बाला बच्चन २५ ऑक्टोबरला चंद्रपूर दौऱ्यावर!
काँग्रेसची महत्त्वाची कार्यकर्ता बैठक आयोजित; जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे व शहर अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांचे आवाहन
चंद्रपूर: लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाला बच्चन हे २५ ते २७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. AICC कडून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आ. बच्चन यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेच्या कामकाजाला गती मिळणार असून, आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीत आ. बाला बच्चन सहभागी होणार आहेत. या बैठकीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती, काँग्रेस संघटनेचे बळकटीकरण तसेच पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची दिशा यावर सविस्तर चर्चा होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
या बैठकीला काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, तालुका स्तरावरील पदाधिकारी, काँग्रेस संघटनेच्या विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल आणि अन्य सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांनी केले आहे.
लोकशाही मूल्यांचे रक्षण, मतदारांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान यशस्वी करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
चला, एकत्र येऊया… लोकशाही आणि संविधान बचावाच्या या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवून ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियान यशस्वी करूया!



