धानोली तांड्यात अवैध दारूचा महापूर; भाऊसिंग, मधुकर आणि रमेशचा उच्छाद!
बिट जमादाराचा ‘विशेष आशीर्वाद’; कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
धानोली तांडा: येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीने सीमा ओलांडली असून, भाऊसिंग, मधुकर, आणि रमेश या त्रिकुटाने संपूर्ण परिसरात दारूचा जणू महापूरच आणला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध धंद्यांना स्थानिक बिट जमादाराचे पूर्ण अभय असल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोली तांडा परिसरात अत्यंत छुप्या आणि काही ठिकाणी उघडपणे मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची विक्री सुरू आहे. भाऊसिंग, मधुकर, आणि रमेश हे तिघे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. या अवैध विक्रीमुळे तांड्यातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, अनेक सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
जमादाराची भूमिका संशयाच्या भोऱ्यात:
एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी अवैध धंदे मोडीत काढण्याच्या सूचना देत असताना, दुसरीकडे धानोली परिसराची जबाबदारी असलेल्या बिट जमादाराचे या विक्रेत्यांशी असलेले ‘अर्थपूर्ण’ संबंध चर्चेचा विषय ठरत आहेत. या विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पोलिसांच्या हालचालींची पूर्वसूचना दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांची मागणी
👉 संबंधित तिन्ही मुख्य आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी.
👉 कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या बिट जमादाराची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी.
👉 तांडा परिसरात गस्त वाढवून कायमस्वरूपी दारूबंदी करावी.
”जर प्रशासनाने याकडे लवकर लक्ष दिले नाही, तर तांड्यातील महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन ‘आशीर्वाद’ देणाऱ्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”






