जि. प. प्रशासनाचा अजब कारभार! चक्क गवतावरच टाकली गिट्टी; पिंपळगाव रस्ता रुंदीकरणाचा ‘बोगस’ प्रकार उघड
गडचांदूर-पिंपळगाव रस्ता कामाचा फज्जा: गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे कंत्राटदाराचे पितळ उघडे
गडचांदूर: पिंपळगाववासीयांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गडचांदूर–पिंपळगाव रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम हाती घेतले खरे, मात्र या कामात कंत्राटदाराने ‘हातसफाई’ सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना चक्क गवतावरच गिट्टी टाकून रस्ता रेटण्याचे काम शाह एजन्सीमार्फत केले जात होते. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नियमानुसार सोलिंग करणे आणि रस्ता स्वच्छ करणे आवश्यक असते. मात्र, कंत्राटदाराने कोणतीही सफाई न करता, आहे त्या गवतावरच गिट्टी टाकून आणि हलकेसे डांबर शिंपडून काम उरकण्याचा प्रयत्न केला. हा निकृष्ट दर्जाचा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काम बंद पाडले आणि जिल्हा परिषद बांधकाम (कोरपना-जीवती) उपविभागाचे उपअभियंता संतोष राठोड यांना पाचारण केले.
तक्रारीची दखल घेत उपअभियंता संतोष राठोड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. कामाचा दर्जा पाहून त्यांनी कंत्राटदाराला चांगलेच खडे बोल सुनावले. अत्यंत बेजबाबदारपणे केलेले हे काम तातडीने काढून टाकण्याचे आणि पुन्हा नियमानुसार सोलिंग करूनच रुंदीकरण करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत.
”विभागीय अभियंत्यांचे या कामावर मुळीच नियंत्रण नाही. त्यामुळेच कंत्राटदार आलोक शहा यांच्या एजन्सीचे असे बोगस काम करण्याचे धाडस वाढले आहे. केवळ वर्षभरही न टिकणारा असा रस्ता आम्हाला नको आहे.”
—ग्रामस्थ, पिंपळगाव
या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही या कामाची तांत्रिक पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






