कोरपना-हेटी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण!
✍️ विजय बोरडे
कोरपना: कोरपना ते कोडशी खुर्द दरम्यानच्या हेटीपर्यंतच्या मुख्य मार्गावर सध्या खड्ड्यांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा मार्ग कोरपना आणि वणी तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतानाही, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात सिमेंट, कोळसा, गिट्टी, डोलोमाईट आणि लाईमस्टोनची ने-आण केली जाते. विशेष म्हणजे, या रस्त्याची वहन क्षमता केवळ २० टन असताना प्रत्यक्षात मात्र त्यावरून कितीतरी पटीने अधिक वजनाची अवजड वाहने धावत आहेत. परिणामी, नवीन केलेला रस्ताही अल्पावधीतच उखडून जात असून त्याची दुर्दशा झाली आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसोबतच आता रस्त्याच्या कडाही मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. रस्ता आधीच अपुरा त्यात समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनाला जागा देताना लहान वाहनधारकांना कसरत करावी लागते. यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली असून, नागरिकांमधून या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासकीय अनास्थेचा कळस म्हणजे, कोरपना ते यवतमाळ जिल्हा सीमेपर्यंत एकही किलोमीटरचा (मैलाचा) दगड शिल्लक नाही. त्यामुळे प्रवाशांना गावातील नेमके अंतर समजत नाही. इतकेच नव्हे तर, गावाची नावे सांगणारे दिशादर्शक फलक, जिल्हा सीमेचे बोर्ड आणि नदीची नावे दर्शवणारे फलकही गायब झाले आहेत.
मागणी: “रस्त्याची ही दुरवस्था पाहता, केवळ मलमपट्टी न करता शासनाने या मार्गाचे कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करावे आणि आवश्यक ते दिशादर्शक फलक तातडीने लावावेत,” अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहतूकदारांकडून केली जात आहे.




