चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे आता चंद्रपूरच्या ‘गावगाड्या’वर; ‘समृद्ध पंचायत राज’साठी साधणार संवाद!
चंद्रपूर: राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६” ला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे उद्या, १० मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आपल्या खास वैदर्भीय शैलीत ते ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामविकासाचे महत्त्व पटवून देणार आहेत.
दौऱ्याचे नियोजन व भेटीची ठिकाणे: भारत गणेशपुरे या दौऱ्यात खालील ग्रामपंचायतींना भेटी देऊन थेट ग्रामस्थांशी चर्चा करतील:
ग्रामपंचायत सागरा (पं.स. भद्रावती)
ग्रामपंचायत नांदगाव पोडे (पं.स. बल्लारपूर)
ग्रामपंचायत जिबगाव (पं.स. सावली)
लोकसहभागातून समृद्धीकडे: या अभियानाचा मुख्य उद्देश पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करणे हा आहे. आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांत ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवून शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. गणेशपुरे यांच्या उपस्थितीमुळे या मोहिमेला ‘लोकचळवळी’चे स्वरूप प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
५ कोटींचे पारितोषिक पटकावण्याची संधी: या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर ५ कोटी रुपयांपर्यंतची भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. प्रामुख्याने सात घटकांवर गावांचे मूल्यांकन केले जाईल:
सुशासन (Good Governance), जलसमृद्धता, स्वच्छता व आरोग्य, डिजिटल शिक्षण, उपजीविकेची साधने, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आवाहन: > “चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात आपले योगदान द्यावे आणि विकासाची नवी गाथा लिहावी,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.






