प्रशासनाचा केवळ ‘खड्डे’ खोदून दिखावा; वाळू माफियांना हवीये आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ची चपराक!
एकाच रॉयल्टीवर दिवसभर ‘खेळ’; महसूल यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून शासनाला कोट्यवधींचा चुना.
मध्यरात्री ट्रॅक्टरचा थरार, गावकरी हवालदिल; कोरपना तालुक्यात रेती तस्करांचे ‘ओपन चॅलेंज’.
कोरपना: तालुक्यात सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल माफियांच्या खिशात जात आहे. पैनगंगा नदी पात्रातील झोटिंग, वनोजा, सोनुर्ली, सांगोडा, परसोडा आणि कोठोडा या घाटांवरून रात्रीच्या सुमारास हजारो ब्रास रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे, तस्करांनी चक्क नदीत वाहने उतरवण्यासाठी स्वतःचे रस्ते तयार केले आहेत.
स्थानिक महसूल प्रशासन केवळ बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जेसीबीने रस्ते खोदून ‘कारवाई’चा देखावा करते. मात्र, तस्कर रात्रीच्या वेळी हे खड्डे बुजवून पुन्हा उपसा सुरू करतात. ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजामुळे गावकऱ्यांची झोप उडाली आहे. यावर्षी एकाही घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपसा होणे, हे प्रशासकीय संगनमताचेच लक्षण असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
सरकारने घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळूचे धोरण आणले, पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. याउलट, भोयगाव आणि भैरम घाटावर एकाच रॉयल्टी (TP) वर दिवसभर अनेक फेऱ्या मारून महसूल विभागाला चुना लावला जात आहे. रात्री ७ ते सकाळी ५ या वेळेत तर कोणतीही भीती न बाळगता अवैध उपसा सुरू असतो.
विना नंबर प्लेटचे आणि ओव्हरलोड ट्रॅक्टर सुसाट धावत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
नदीचे नुकसान: अनियंत्रित उपशामुळे जलस्त्रोत धोक्यात आले आहेत.
कठोर कारवाईची गरज: केवळ दंड न आकारता वाहने कायमस्वरूपी जप्त करावीत आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करून ‘सर्जिकल स्ट्राईक’ सारखी गुप्त कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या मुजोर माफियांच्या मुसक्या आवळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






