सावधान! ‘साई नगरी’ लेआउटमध्ये प्लॉट घेताय? आधी ही बातमी वाचा!
विना रॉयल्टी वाळूचे ढीग आणि अकृषक (NA) वापरावर शंका; महसूल प्रशासनाचे लेआउटधारकांवर ‘विशेष आशीर्वाद’ असल्याची चर्चा
✍️ मोहब्बत खान
कोरपना / धोपटाळा: स्वप्नातील घरासाठी प्लॉट शोधणाऱ्या नागरिकांसाठी एक धोक्याची घंटा समोर येत आहे. कोरपना लगत असलेल्या धोपटाळा येथील साई नगरी लेआउट (सर्व्हे नं. ११९) सध्या विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, या ठिकाणी सुरू असलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साई नगरी लेआउटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या वाळूची कोणतीही अधिकृत रॉयल्टी भरली नसल्याचा प्राथमिक आरोप नागरिक करत आहेत. शासनाचा महसूल बुडवून या ठिकाणी अनधिकृत वाळूचे ढिगारे नेमके आले कुठून? आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, या लेआउटला प्रशासनाचे अभय लाभले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
NA (अकृषक) शंका: सर्व्हे नं. ११९ हे क्षेत्र खरंच ‘कृषक’ मधून ‘अकृषक’ (Non-Agricultural) झाले आहे का? याबाबत नागरिकांच्या मनात दाट शंका आहे.
ना हरकत प्रमाणपत्र (NOC): संबंधित विभागाकडून आवश्यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न घेताच या ठिकाणी प्लॉट्सची विक्री आणि कामांचा सपाटा लावला गेल्याचा आरोप होत आहे.
दलालांचे अजब दावे
प्लॉट विक्री करणाऱ्या दलालांशी संपर्क साधला असता, त्यांनी एक अजबच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ज्या मालकाने वाळू टाकली आहे, त्याच्याकडेच रॉयल्टी आहे.” मात्र, नियमानुसार वाळू साठवणूक आणि वाहतुकीसाठी आवश्यक असलेले अधिकृत परवाने आणि रॉयल्टी पावती दाखवण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ‘दाल मे कुछ काला है’, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
“प्लॉट घेण्यापूर्वी कागदपत्रांची शहानिशा करा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. विना रॉयल्टी वाळू साठा करणे हा गुन्हा असून यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”






