सावधान! कोरपना परिसरात ‘फोन पे’च्या नावाखाली गंडा; कॅश घेऊन खात्यातून पैसे गायब करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट
तात्काळ कारवाई करण्याची नागरिकांची मागणी; सायबर भामट्यांच्या नवीन ‘फंडा’मुळे सर्वसामान्य हैराण
कोरपना: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून, विशेषतः ‘फोन पे’ आणि ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या नावाखाली सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. “पैसे रोख घ्या आणि माझ्या खात्यातून तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करतो” असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सायबर भामटे अत्यंत चलाखीने आपली जाळी विणतात. एखाद्या व्यक्तीला गाठून “माझ्याकडे कॅश शिल्लक आहे, ती तुम्ही घ्या आणि तेवढेच पैसे माझ्या अकाउंटवर किंवा अन्य एका नंबरवर ‘फोन पे’ करा” अशी विनंती केली जाते. समोरील व्यक्ती विश्वासाने व्यवहार करते, मात्र दुसऱ्याच दिवशी किंवा काही तासांतच संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे परस्पर ‘मायनस’ किंवा गायब होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेऊन हे भामटे लोकांच्या कष्टाची कमाई लंपास करत आहेत.
अनेकांना बसला फटका: कोरपना शहर आणि परिसरातील अनेक सुशिक्षित तरुण आणि व्यापारी या प्रकाराला बळी पडले आहेत. व्यवहार पूर्ण झाल्याचा मेसेज मोबाइलवर येतो, पण प्रत्यक्षात बँकेतून पैसे वळते केले जातात. एकदा पैसे गायब झाले की संबंधित आरोपीचा पत्ता लागत नाही, ज्यामुळे पीडित नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या वाढत्या सायबर क्राईममुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायबर सेलने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अशा टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन पैशांचे व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.
”कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून पैसे कॅश घेऊन आपल्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार करणे धोक्याचे ठरू शकते. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.”





