कोरपना ग्रामीण रुग्णालयाचा रामभरोसे कारभार; वैद्यकीय अधीक्षकांचा मुख्यालयाला ‘खो’!
दोन महिन्यांपासून साहेबांची खुर्ची रिकामीच; सीसीटीव्ही तपासल्यास ‘सत्य’ येईल समोर
कोरपना: येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी झाली आहे. रुग्णालयाचे सर्वेसर्वा असलेले वैद्यकीय अधीक्षक मागील दोन महिन्यांपासून रुग्णालयात फिरकलेच नसल्याची खळबळजनक चर्चा परिसरात रंगत आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत असून, प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
शासकीय नियमानुसार वैद्यकीय अधीक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना, कोरपना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक नेमके कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांनी रुग्णालयात पाऊलही ठेवले नसल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय, अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत.
रुग्णालयातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आणण्यासाठी जास्त पुराव्यांची गरज नाही. वरिष्ठांनी केवळ मागील दोन महिन्यांतील रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) आणि हजेरी पटाची तपासणी केल्यास सर्व प्रकार उघडकीस येऊ शकतो. सीसीटीव्हीमध्ये साहेब किती वेळा आले आणि किती वेळ थांबले, याचा ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, अशी मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण मोठ्या आशेने या रुग्णालयात येतात. मात्र, मुख्य अधिकारीच गायब असल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी, आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून सामान्य जनतेला खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे.
आता या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक या ‘बेपत्ता’ अधीक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






