जिवती तालुक्यातील धक्कादायक घटना: सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याने गमावला जीव; शासकीय मदतीसाठी सुदाम राठोड यांचा पाठपुरावा
जिवती:
जिवती तालुक्यातील संगणापूर येथील एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संगणापूर येथील अल्पवयीन/युवा शेतकरी शुभम बाबाराव पोले यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण संगणापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुदाम राठोड यांनी तात्काळ संगणापूर येथे जाऊन पीडित पोले कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी बोलताना सुदाम राठोड यांनी, “पोले कुटुंबावर झालेला हा आघात अत्यंत दुःखद असून या कठीण प्रसंगात संपूर्ण पक्ष आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा धीर दिला. तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाकडे तीव्र पाठपुरावा करून विनंती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी सुदाम राठोड यांच्यासमवेत भाजप कार्यकर्ते गोपी राठोड, विशाल राठोड यांच्यासह गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




