नगरपंचायतीचा अजब कारभार! वर्षानुवर्षे अतिक्रमण आणि सीसीटीव्हीसाठी ‘बघ्याची भूमिका’, पण ऐन गणेशोत्सवात मात्र मंडळांनाच नोटीसचा बडगा
कोरपना:
शहरातील वाढत्या समस्यांकडे आणि नागरिकांच्या वारंवार केलेल्या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या कोरपना नगरपंचायतीचा एक अजब आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. वर्षानुवर्षे शहरात मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटवले नाही आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले नाहीत; मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर थेट गणेश मंडळांनाच नोटिसा बजावून प्रशासनाने विघ्नसंतोषी कारभाराचा प्रत्यय दिला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे कोरपना शहरातील नागरिक आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरपना शहरात वाहतुकीची कोंडी करणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य मार्गांवर आणि बाजारपेठेत अनधिकृत टपऱ्या व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, महिलांच्या सुरक्षेचा आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिक व विविध संघटना वारंवार निवेदनाद्वारे करत आहेत. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई करण्याची तसदी नगरपंचायतीने घेतली नाही.
शहरातील मूलभूत सुविधा आणि सुरक्षा रामभरोसे असताना, आता मात्र आनंदोत्सवाचा सण असलेल्या गणेशोत्सवात विघ्ने आणण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे. प्रशासनाने कोणत्याही पूर्वतयारीशिवाय किंवा सुविधा पुरवल्याशिवाय सरसकट गणेश मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. सणाच्या काळात अडथळा निर्माण करू नका, अशा आशयाची फर्मान सोडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
”शहरातील मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची आणि सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करूनही नगरपंचायत डोळेझाक करते, पण सणाच्या काळात मात्र मंडळांना वेठीस धरण्याचे काम करते. प्रशासनाचा हा दुजाभाव सहन केला जाणार नाही.”
— संतप्त नागरिक, कोरपना
वर्षभर नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ सण-उत्सवांच्या काळात कागदी घोडे नाचवणाऱ्या नगरपंचायतीच्या या भूमिकेविरुद्ध नागरिक आता संघटित होत असून, प्रशासनाने हा जाचक पवित्रा त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.





