चंद्रपुरात रेती माफियांचे धाबे दणाणले! ३० लाखांच्या हायवासह अवैध रेतीचा महासाठा जप्त; पोलिसांच्या धडक कारवाईने उडाली खळबळ!
चंद्रपूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर पोलिसांनी अत्यंत कठोर आणि आक्रमक बडगा उगारला आहे. विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून तब्बल ३० लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि ९ ब्रास अवैध रेती असा एकूण ३० लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे रेती चोरांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यात खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत यांना अवैध रेती वाहतुकीबाबत अत्यंत गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विरुर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) राजेंद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १:२० च्या सुमारास धानोरा आर्वी टी पॉईंट येथे अत्यंत चलाखीने नाकेबंदी केली. यादरम्यान आर्वीकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका संशयित हायवाला (MH34BZ9950) पोलिसांनी चोहोबाजूंनी घेरून रोखले.
चौकशीत बिंग फुटले: चालक आणि मालक जाळ्यात!
पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली असता, त्या ट्रकमध्ये विनापरवाना तब्बल ९ ब्रास रेती भरलेली आढळली. कसून चौकशी केली असता, चालकाने आपले नाव दत्ता दशरथ मेश्राम (रा. बाबुपेट, चंद्रपूर) असल्याचे सांगितले. तसेच हा अवैध माल शैलेश अशोक केळझरकर (रा. तिर्थरुप नगर, चंद्रपूर) याच्या इशाऱ्यावरून नेण्यात येत असल्याची कबुली चालकाने दिली. पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांतच ३० लाखांचे वाहन, रेती आणि आरोपींना बेड्या ठोकल्या.
अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चालक दत्ता दशरथ मेश्राम आणि मालक शैलेश अशोक केळझरकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२), ४९ आणि ३(५) नुसार विरुर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशीच धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




