देशाच्या एकात्मतेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर! राजुरा काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन!
इंदिराजींच्या कणखर नेतृत्वाचे, तर लोहपुरुष पटेलांच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण; अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन कार्यक्रम संपन्न!
राजुरा: देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या दोन महान राष्ट्रीय नेत्यांच्या स्मृतींना राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भारताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तहसील कार्यालयाजवळील राजुरा विधानसभा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. देश प्रथम, राष्ट्रहित सर्वोच्च आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्व. इंदिरा गांधी यांच्या धाडसी नेतृत्वाची, देशाच्या सार्वभौमत्वासाठी त्यांनी घेतलेल्या ठाम निर्णयांची तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीत बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची आठवण करून देण्यात आली.
दोन्ही नेत्यांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून त्यांचे राष्ट्रप्रेम, दूरदृष्टी आणि सार्वजनिक जीवनातील योगदान आजही देशासाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या अभिवादन कार्यक्रमाला राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कुर्मदास पावडे, कवडू सातपुते, सुदर्शन दाचेवार, भास्कर चौधरी, सय्यद साबिर, प्रणय लांडे, अशोक राव, हेमंत झाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकीकडे देशाच्या राजकीय इतिहासात मोलाचा ठसा उमटवणाऱ्या इंदिरा गांधींच्या स्मृतींना उजाळा, तर दुसरीकडे अखंड भारताच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सरदार पटेलांच्या कार्याचे स्मरण! अशा प्रकारे राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने दोन्ही महान नेत्यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.



