कोरपना नगरपंचायतीचा ‘रामभरोसे’ कारभार: नगररचनाकारांच्या सततच्या गैरहजेरीमुळे अतिक्रमणांचा विळखा पुन्हा घट्ट!
नागरिकांचे हेलपाटे सुरूच; संबंधित अधिकाऱ्याचा फोन घेण्यासही नकार
कोरपना: शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाने मोठी मोहीम राबवून रस्ते मोकळे केले होते. मात्र, प्रशासनाचा हा धाक अवघ्या काही दिवसातच पुसल्या गेला असून, सध्या शहरात ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणावर नियंत्रण ठेवणारे नगररचनाकार (Town Planner) कार्यालयातून सतत बेपत्ता राहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अतिक्रमणांचे पीक: दुकानांसमोर पत्र्यांचे शेड मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटवल्यानंतर काही काळ मोकळा श्वास घेणाऱ्या कोरपना शहरात आता पुन्हा दुकानदारांनी रस्ते गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांपुढे चक्क लोखंडी खांब उभे करून तीन ते पाच फुटांपर्यंतचे टीन शेड टाकले आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
अधिकारी ‘नॉट रिचेबल’ या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आणि तक्रार देण्यासाठी नागरिक वारंवार नगरपंचायत कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, नगररचनाकार आपल्या खुर्चीवर कधीच उपलब्ध नसतात, अशी तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, नागरिक त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते फोन उचलत नाहीत किंवा योग्य उत्तर देत नाहीत.
”आम्ही वारंवार कार्यालयात जातो, पण साहेब कधीच भेटत नाहीत. अतिक्रमणामुळे रस्ते पुन्हा अरुंद होत आहेत आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न पडत आहे.”— एक संतप्त नागरिक, कोरपना.
प्रमुख समस्यांकडे दुर्लक्ष: मोहीम ठरली कुचकामी: लाखाे रुपये खर्च करून राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता कागदावरच असल्याचे दिसत आहे.
नियोजनाचा अभाव: नगररचनाकारांच्या गैरहजेरीमुळे शहराच्या नियोजित विकासाचा बोजवारा उडाला आहे.
सर्वसामान्यांची अडवणूक: छोटे विक्रेते आणि नागरिक कामासाठी येतात, मात्र अधिकारी नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागते.
आता या प्रकरणात वरिष्ठ प्रशासन लक्ष घालून संबंधित नगररचनाकारावर शिस्तभंगविषयक कारवाई करणार का आणि पुन्हा एकदा शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करणार का? याकडे संपूर्ण कोरपनावासीयांचे लक्ष लागले आहे.







