जिद्दीची कमाल! आवाळपूरचा पुण्यदीप PSI परीक्षेत राज्यात तिसरा; एकाच वेळी तीन पदांना गवसणी
आवाळपूर: जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते, हे आवाळपूर येथील पुण्यदीप दीपक शिलारकर याने सिद्ध करून दाखवले आहे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत पुण्यदीपने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत एकाच वेळी तीन पदे मिळवून गावाचे नाव राज्यभर उजळवले आहे.
पुण्यदीपचे प्राथमिक शिक्षण आवाळपूर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने ब्रह्मपुरी येथून पॉलिटेक्निक आणि अमरावती येथील राम मेघे महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. २०२० पासून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला चंद्रपूर येथे राहून अभ्यास केला, मात्र वडिलांच्या निवृत्तीनंतर आर्थिक ओढाताण सुरू झाल्याने त्याने खचून न जाता गावी परतण्याचा निर्णय घेतला.
गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालयात बसून त्याने आपला अभ्यास सुरूच ठेवला. या कष्टाचे फळ त्याला २०२४ मध्ये मिळाले. त्याने कनिष्ठ लेखापाल (कोषागार विभाग), राज्य कर निरीक्षक (STI) आणि आता पोलीस उपनिरीक्षक (PSI) अशा तीनही पदांवर यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
आवाळपूर गावातून राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक होणारा तो पहिलाच तरुण ठरल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे. “आई-वडील, ताई आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो,” अशा भावना पुण्यदीपने व्यक्त केल्या आहेत. सध्या तो मुंबई येथे कनिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असून त्याच्या या यशाने ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.






