Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

गडचांदूरमध्ये खळबळ! उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाच घेताना सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात

गडचांदूरमध्ये खळबळ! उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाच घेताना सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात

​गडचांदूर/कोरपणा :

शासकीय सेवा पारदर्शकपणे आणि वेळेत मिळण्याच्या अपेक्षेने नागरिकांची पावले ‘सेतू केंद्रां’कडे वळतात. मात्र, याच सेतू केंद्रांवरून सामान्यांच्या लुटीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त विनाकारण लाचेची मागणी करणाऱ्या गडचांदूर येथील ‘दिशा ऑनलाइन सर्व्हिसेस’ व शासकीयमान्य सेतू केंद्रावरील चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. सचिन रामचंद्र खेडे (वय ४० वर्षे) असे जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

​​चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील एका ५२ वर्षीय नागरिकाला स्वतःच्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला काढायचा होता. यासाठी त्यांनी गडचांदूर येथील शासकीयमान्य सेतू केंद्र गाठले. मात्र, तिथे कार्यरत असलेला सचिन खेडे याने नियमानुसार ठरलेल्या शासकीय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त पैशांची (लाचेची) मागणी केली. या त्रासाला कंटाळून नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर गाठत ०७ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी तक्रार दाखल केली.

​तक्रार प्राप्त झाल्यानंतर चंद्रपूर एसीबीच्या पथकाने अत्यंत वेगाने हालचाली करत तातडीने ०७ सप्टेंबर २०२६ रोजीच तक्रारीची पडताळणी केली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या या पडताळणीमध्ये, आरोपी सचिन खेडे याने शासकीय शुल्काशिवाय बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले.

​त्यानंतर एसीबीच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पंचांसमक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने सचिन रामचंद्र खेडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

​जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्रांसाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सेतू केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, अशाच हक्काच्या शासकीय सेवा देण्याच्या नावाखाली जर सामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असेल, तर तो चिंतेचा विषय बनतो. गडचांदूरमधील या धडक कारवाईमुळे विनाकारण जादा पैसे उकळणाऱ्या व लाचखोरी करणाऱ्या केंद्राचालकांचे धाबे दणाणले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.

Popular Articles

error: Content is protected !!