कोरपना येथील रिक्षावाल्यांची दादागिरी रोखणार कोण?
धक्कादायक घटना, भर चौकात रिक्षा चालकाकडून रिक्षा चालकाला जीवे मारण्याची धमकी, शहरात खळबळ
कोरपना:शहरात दिवसेंदिवस रिक्षांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत रिक्षाचालकांची मनमानीदेखील मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रस्त्याने पायी चालणार्या प्रत्येकाला या मुजोरीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मुख्य बस स्टॉप चौक ते तहसील कार्यालय पोहोचणे शक्य नसल्याने रिक्षा हाच तेथील नागरिकांपुढे पर्याय आहे. या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी मनमानी कारभार सुरू केला असून, प्रवासी या वाढत्या दादागिरीमुळे त्रस्त झाले आहेत. शहरात विविध भागांत दादागिरीचा वापर करत याच रिक्षाचालकांनी अनधिकृत थांबे तयार केले असून, ते थांबेसुद्धा अनेक वेळा परिसरातील रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
रिक्षाचालकांच्या उद्दाम वागण्याला अनेकदा प्रवाशांना सामोरे जावे लागते. काही जण या विरोधात तक्रार करतात. तर काही जण दुर्लक्ष करून आपली वाट धरतात. अनेकदा सुट्टे पैसे आणि प्रवासाचे स्थळ यावरून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये तूतू मैं मैं होते. क्वचित प्रसंगी या तूतू मैं मैं चं पर्यवसान वादात होते. त्यामुळे गंभीर दुर्घटनासुद्धा घडतात. कोरपना येथे अनेक ऑटो रिक्शा चालक मालक यांच्याकडे लायसन्स नसल्याची तक्रार कानावर येत असून अनेक ऑटो रिक्षा धारकांकडे वाहन फिटनेस, वाहन परमिट, बॅच, नसल्याचे समजते काही ऑटो रिक्षा तर आंतरराज्य पासिंग (TS तेलंगणा) पासिंग असलेले आढळले मात्र यावर कारवाई करणार कोण? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
शहरात गुंड प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांची दादागिरी वाढली आहे, त्याचा त्रास सामान्य रिक्षाचालकाला होत आहे. त्यामुळे दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






