ऐतिहासिक!कोरपना पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच ‘त्या’ लाभल्या महिला पोलीस निरीक्षक
कोरपना: कोरपना येथील पोलीस स्टेशनच्या इतिहासात प्रथमच एका महिला पोलीस निरीक्षक (Police Inspector – PI) यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. लता वाडीवे यांनी दि. 04/11/2025 रोजी सुनील गाडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे पोलीस दलासह स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल: या पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस निरीक्षक मिळाल्यामुळे हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.
लता वाडिवे या यापूर्वी सायबर सेल चंद्रपूर येथे कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कामातून उत्कृष्ट प्रशासकीय क्षमता आणि गुन्हेगारी नियंत्रणातील प्रभावी कामगिरी सिद्ध केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिलांशी संबंधित गुन्ह्यांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांकडून स्वागत: कोरपना येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल टोंगे यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, “एका महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सहज होईल. विशेषतः महिलांना त्यांच्या समस्या घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येणे सोपे जाईल.”
लता वाडीवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले की, “स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी माझे प्राधान्य असेल. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य न्याय मिळेल याची मी काळजी घेईन.”






