कोरपना आयटीआयचा कारभार रामभरोसे; पाच वाजेपूर्वीच अधिकारी-कर्मचारी पसार!
कोरपना: तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कार्यालयीन वेळेचे उल्लंघन करत, येथील कर्मचारी सायंकाळी पाच वाजेपूर्वीच कार्यालयाला कुलूप लावून ‘पसार’ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ पर्यंत असतानाही, कोरपना येथील आयटीआयमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी आणि कामानिमित्त येणारे नागरिक जेव्हा सायंकाळी ४:३० ते ५:०० च्या सुमारास संस्थेत पोहोचतात, तेव्हा त्यांना कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळतो. काही महत्त्वाचे विभाग तर ५ वाजेच्या आतच बंद झालेले असतात.
विद्यार्थ्यांचे होत आहे शैक्षणिक नुकसान ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा दाखले, शिष्यवृत्तीचे फॉर्म किंवा इतर कामांसाठी संस्थेत यावे लागते. लांबचा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांना कर्मचारी वेळेपूर्वीच निघून गेल्यामुळे रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांच्या शैक्षणिक कामात अडथळे निर्माण होत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष? संस्थेतील या अनागोंदी कारभारावर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतः वेळेवर उपस्थित नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे फावले असल्याची चर्चा परिसरात आहे. बायोमेट्रिक हजेरीचा नियम असतानाही कर्मचारी इतक्या लवकर कार्यालय कसे सोडू शकतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
”आम्ही दूरवरून कामासाठी आलो होतो, पण ५ वाजताच कार्यालय बंद दिसले. विचारणा केली असता कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. शासकीय पगारावर डल्ला मारणाऱ्या अशा कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.”— एक त्रस्त नागरिक
कारवाईची मागणी कोरपना आयटीआयमधील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.




