महसूल प्रशासनाचा अजब कारभार: छोट्या ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा, मात्र ‘हायवा’ माफियांना तहसीलदारांचा आशीर्वाद?
राजकीय नेत्याच्या वाहनांकडून रेतीची राजरोस तस्करी; शहरात सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
✍️मोहब्बत खान
कोरपना: तालुक्यात महसूल प्रशासनाचा दुटप्पी कारभार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी रेतीची वाहतूक करणाऱ्या छोट्या ट्रॅक्टर धारकांवर महसूल विभाग कठोर कारवाई करत असताना, दुसरीकडे बड्या राजकीय नेत्यांच्या मालकीची ‘हायवा’ वाहने राजरोसपणे रेती तस्करी करत आहेत. या प्रकारामुळे “नियम फक्त गरिबांसाठीच आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
राजकीय वरदहस्त आणि ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका वजनदार राजकीय नेत्याच्या मालकीची हायवा वाहने दररोज विनापरवाना रेतीची वाहतूक करत आहेत. या वाहनांकडे तहसीलदारांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे. सामान्य शेतकऱ्याचा किंवा गरजूचा ट्रॅक्टर दिसताच कारवाई करणारे पथक या मोठ्या वाहनांना पाहून डोळेझाक का करते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सीसीटीव्हीसाठी फक्त आश्वासनेच!
शहरातील रेती तस्करी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. यासंदर्भात स्थानिक पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, प्रशासन केवळ आश्वासने देण्यातच धन्यता मानत आहे. सीसीटीव्ही नसल्याचा फायदा घेत रेती माफिया रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
प्रशासनाच्या या पक्षपाती भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “आम्ही वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसेल, तर प्रशासनावर कोणाचा दबाव आहे?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.






