कोरपना मतदार यादीत मोठा ‘घोटाळा’? बोगस कागदपत्रांच्या आधारे नावांची नोंद; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार
✍️ मोहब्बत खान
कोरपना: कोरपना नगरपंचायत क्षेत्रातील मतदार यादीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि वयाची अट पूर्ण नसतानाही शेकडो नवमतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याचा आरोप करत, दोषींविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माहिती अधिकारातून फुटले भांडे
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा कोरपना येथील मतदार यादीच्या भाग क्रमांक ५६, ५७, ५८ व ५९ मध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद नावांची नोंद झाल्याची शंका स्थानिक नागरिकांना आली होती. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकारांतर्गत ०१ ऑक्टोबर २०२४ ते ०१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत समाविष्ट झालेल्या ११५ नवमतदारांची यादी आणि त्यांची कागदपत्रे मागवण्यात आली होती. या कागदपत्रांच्या पडताळणीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कमी वयातच बनले ‘मतदार’: तक्रारदारांनी पुराव्यासह दिलेल्या माहितीनुसार, या यादीतील अनेक तरुण-तरुणींनी वयाची पात्रता (१८ वर्षे पूर्ण) नसतानाही खोट्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांचा किंवा इतर बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घेतली आहेत. विशेषतः ओंकार पांडुरंग वरभे आणि पारुल श्रीकृष्ण कोडापे यांसारख्या नावांच्या नोंदणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई: तहसील कार्यालय कोरपना येथील निवळणूक कर्मचारी गणेश सोडणर यांनी दिलेल्या माहितीनुसार ११५ लोकांची यादी समोर आली असली, तरी या प्रक्रियेत कागदपत्रांची योग्य पडताळणी का केली गेली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला काळिमा फासण्यासाठी काही राजकीय हितसंबंधांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून हा ‘बोगस’ कारभार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
👉 निवेदनातील प्रमुख मागण्या:
बनावट कागदपत्रांच्या आधारे नाव नोंदणी करणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी व्हावी.
निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या संबंधित कर्मचारी व दोषींविरुद्ध कडक फौजदारी कारवाई (FIR) करावी.
बोगस नावे तातडीने मतदार यादीतून वगळून यादी नियमानुसार शुद्ध करण्यात यावी.
”हा केवळ तांत्रिक घोळ नसून लोकशाहीच्या मूल्यांशी खेळ आहे. जर पात्र नसतानाही नावे नोंदवली जात असतील, तर खऱ्या मतदारांच्या हक्कावर गदा येत आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— पवन बुरेवार, तक्रारदार, कोरपना.
या तक्रारीनंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार कोरपना या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






