Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना केंद्रीय सहसचिवांची भेट

शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना केंद्रीय सहसचिवांची भेट

चंद्रपूर: प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशातील 100 जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सहसचिव तथा प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचे केंद्रीय नोडल अधिकारी आशिष मोरे यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध शेतक-यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली.

पडोली येथे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संगिता प्रशांत मुस्कावार यांच्या पॉलीहाऊस येथे ऑरचिड कल्टीव्हेशन व ड्रॅगन फ्रुट फॉर्मची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऑरचिडची रोपे कुठून आणली, कोणत्या हंगामात लावली जातात, एक रोप किती काळ टिकते, यासाठी एकूण किती खर्च आला, ऑरचीडची फुलांचे मार्केट कुठे आहे, इतर राज्यातून मागणी होते का, होत असल्यास कशी विक्री केली जाते, या रोपांना स्प्रिंकलरने किती वेळा पाणी द्यावे लागते आदी माहिती जाणून घेतली. तसेच आंब्याच्या बागेची पाहणी केल्यानंतर ड्रॅगन फ्रुटचे किती वर्षाचे नियेाजन केले आहे. एका एकर मध्ये किती झाडे लावता येतात याबाबत विचारणा केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, शेतकरी प्रशांत मुस्कावार उपस्थित होते.

साखरवाही (ता. चंद्रपूर) येथे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मत्स्य बोटुकली संचयन कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी सहसचिव मोरे यांनी तलावातून मासे कसे पकडतात, याचे प्रात्यक्षिक बघितले. या तलावात कोणकोणत्या प्रकारचे मासे आहेत, एका दिवसात किती पकडले जातात, त्याची विक्री कुठे होते, मत्स्यसंवर्धन विभागाकडून अनुदान प्राप्त होते का, याची माहिती जाणून घेतली. यावेळी मच्छिमार बांधवांनी तलावाची खोलीकरण करण्याची मागणी केली. यावर नक्कीच उपाययोजन केल्या जातील, असे श्री. मोरे यांनी सांगितले.

भद्रावती तालुक्यात नंदोरी येथे वनक्रांती शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या वतीने चालविण्यात येणा-या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र शेत बांधावरील प्रयोग शाळेला सहसचिव श्री. मोरे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, येथे येवून अतिशय चांगला अनुभव मिळाला, जैविक प्रक्रियेबाबत येथील प्रयोगशाळा अतिशय उत्तम आहे. परिसरातील 500 शेतक-यांना सेंद्रीय द्रव्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, ही अतिश्य कौतुकास्पद बाब आहे. 500 कुटुंबाची उपजिविका या युनिटवर चालते, हे काम निरंतर चालू ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर चिनोरा (ता. वरोरा) येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येथे संचालक व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय सहसचिव आशिष मोरे यांनी भेट दिली. केंद्र सरकारने जुलै 2025 मध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवणे, योजनांचे एकत्रीकरण करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, साठवणूक क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे इत्यादी उद्देश समोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती आशिष मोरे यांनी दिली.

यावेळी कांचनी येथील जिनिंग व प्रेसिंग युनिट, धान्य साठवणे व प्रतवारी युनिट, 3000 मेट्रिक टन गोडाऊन ला भेट देऊन सविस्तर चर्चा केली. कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी धोबे यांनी प्रकल्पाची माहिती व संकल्पना सांगितली तर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे, तालुका कृषी अधिकारी रवी राठोड, मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, उप तालुका कृषी अधिकारी आडकिने यांच्यासह भानूदास बोधाने कोंडाळा, चंद्रहास मोरे खेमजई व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles

error: Content is protected !!