महावितरणच्या कामावरील मजुराचा मृत्यू; कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा की घातपात? तांबाडी फाट्यावरील घटनेने खळबळ
आंध्र प्रदेशातील मजुराचा मृत्यू; मारहाण झाल्याचा स्थानिकांचा दावा, कंत्राटदार कंपनीकडून माहिती देण्यास नकार?
कोरपना (चंद्रपूर): महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांतर्गत इलेक्ट्रिक पोल उभारणीचे काम करणाऱ्या एका मजुराचा राहत्या ठिकाणी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोला बलरामुडू असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे. या घटनेमुळे कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा आणि मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना शहराजवळील तांबाडी फाट्यावरील एका शेतात ४-५ मजूर वास्तव्यास होते. याच ठिकाणी कोला बलरामुडू यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिक आणि महिलांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मृत व्यक्तीला त्याच्याच सोबत काम करणाऱ्या इतर ४-५ मजुरांनी बांधून मारहाण केल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत आहे.
ज्या कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे, त्या कंपनीने मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीबाबत कोणतीही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. कंपनी प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.
सध्या मृतदेह कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (PM) पाठवण्यात आला आहे. बलरामुडू यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, कामाच्या ताणामुळे झाला की नागरिकांनी केलेल्या दाव्यानुसार घातपातामुळे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सोबत राहणाऱ्या मजुरांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मजुरांच्या सुरक्षेबाबत बेजबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.






