प्रशासकीय पाऊल जनतेच्या दारी! कोरपना तालुक्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरांचे’ आयोजन
एकाच छताखाली मिळणार महसूल आणि शासकीय योजनांचा लाभ; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कोरपना: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी कोरपना तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१’ मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील विविध मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात येणार आहे.
असे आहे शिबिरांचे वेळापत्रक:
तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी मंडळनिहाय खालीलप्रमाणे तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत:
अ.क्र. दिनांक शिबिराचे ठिकाण (मंडळ/कार्यालय)
१ ७ मार्च २०२६ गडचांदूर (गडचांदूर मंडळ)
२ १४ मार्च २०२६ मांडवा (कोरपना मंडळ)
३ १० एप्रिल २०२६ आवाळपूर (नांदा मंडळ)
४ १७ एप्रिल २०२६ वनसडी (नारंडा मंडळ)
५ ८ मे २०२६ नगर परिषद, गडचांदूर
६ ९ मे २०२६ तहसील कार्यालय, कोरपना
या सेवांचा घेता येणार लाभ:
या समाधान शिबिरामध्ये एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने:
👉 दाखले वाटप: विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप.
👉 ७/१२ व ८-अ मोहिमा: वारस नोंदी, लक्ष्मी मुक्ती, ई-मोजणी आणि प्रलंबित फेरफार निकाली काढणे.
👉 जमीन सुधारणा: भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण तपासणी आणि अकृषक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन.
👉 शासकीय योजना: सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज भरणे, ‘लाडकी बहीण’ योजना e-KYC आणि आभा कार्ड (आरोग्य) सुविधा.
👉 शेतकरी सुविधा: पीएम किसान लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ई-केवायसी कामकाज.
प्रशासनाचे आवाहन
”महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही ‘एक खिडकी योजना’ राबवली जात आहे,” असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
या मोहिमेत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, तरुण मंडळ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, कोरपना यांच्या वतीने करण्यात आले आहे.




