पंतप्रधान आणि राष्ट्रध्वजाचा अवमान भोवला; परसोडा येथील तरुणावर कोरपना पोलिसांत गुन्हा दाखल
देशाच्या अस्मितेचा अपमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) नवीन कलमान्वये कारवाई; कोरपना तालुक्यातील खळबळजनक घटना.
कोरपना (चंद्रपूर): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रध्वज तिरंगा यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटस ठेवणाऱ्या एका समाजकंटकावर कोरपना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निकेश खेतकर (रा. परसोडा, ता. कोरपना) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
परसोडा येथील रहिवासी कार्तिक इस्तारी गोनलावार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, निकेश खेतकर याने आपल्या मोबाईल क्रमांकावर (९०६७९५१३९५) देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रध्वज यांचा अपमान करणारा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवला होता. हा प्रकार निदर्शनास येताच राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. आपल्या देशाच्या प्रतीकांचा आणि सर्वोच्च पदाचा अवमान झाल्यामुळे भावना दुखावल्याचे अर्जदाराने तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारदाराच्या लेखी रिपोर्टवरून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोरपना पोलीस निरीक्षकांच्या आदेशान्वये तातडीने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करण्याच्या प्रक्रियेसह पुढील तपास सुरू केला आहे.
खालील कलमान्वये गुन्ह्याची नोंद:
👉 भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३: कलम ३५६(२) आणि ३५३.
👉 माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act), २०००: कलम ६७.
”देशाचा राष्ट्रध्वज आणि सन्माननीय पंतप्रधान हे संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. त्यांचा अवमान करणाऱ्या कोणत्याही कृत्याची गय केली जाणार नाही. कायद्यानुसार अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्यात येत आहे.”— कोरपना पोलीस प्रशासन






