स्टेला मारिस कॉन्व्हेंटचा ‘गजब’ फर्मान; फी भरा नाहीतर परीक्षेला बसू देणार नाही!
कोरपना: येथील स्टेला मारिस शाळेने थकीत फी वसुलीसाठी पालकांना थेट ‘अल्टिमेटम’ दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. “उर्वरित फी भरा, अन्यथा परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” असा कडक पवित्रा शाळा प्रशासनाने घेतल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
फी वसुलीसाठी शिक्षणाचा अडथळा?
शाळेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची थकीत फी ०९ मार्च २०२६ पर्यंत भरणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, फी न भरल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होईल आणि त्यांना अंतिम परीक्षेत बसू दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेच्या काळात कोणतीही सबब ऐकली जाणार नाही, असेही शाळेने ठणकावून सांगितले आहे.
नव्या सत्राचे नियमही कडक: केवळ फीच नव्हे, तर नव्या शैक्षणिक सत्राबाबतही (२०२६-२७) शाळेने कडक नियमावली जाहीर केली आहे:
हजेरी अनिवार्य: इयत्ता १ ली ते ९ वीचे वर्ग १ एप्रिल २०२६ पासून सुरू होतील. पहिल्याच दिवशी हजेरी लावणे बंधनकारक आहे.
पुन्हा शिकवणार नाही: एप्रिल महिन्यात शिकवलेला अभ्यासक्रम पुन्हा घेतला जाणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे.
रिपोर्ट कार्ड सक्तीचे: नवीन पुस्तके घेण्यासाठी येताना पालकांना जुने रिपोर्ट कार्ड सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पालकांमध्ये नाराजी
परीक्षेच्या तोंडावर अशा प्रकारे आर्थिक दबाव टाकणे कितपत योग्य आहे, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





