दोषी BLO वर कारवाईची टांगती तलवार! १८ वर्षांखालील युवकांची नावे मतदार यादीत घुसवल्याचा धक्कादायक प्रकार
कोरपना: लोकशाहीचा सर्वात पवित्र दस्तऐवज असलेल्या मतदार यादीच्या शुद्धीकरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरपना येथे १८ वर्षांखालील युवकांची नावे चक्क मतदार यादीत समाविष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण महसूल आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत तहसील प्रशासनाने संबंधित ‘बीएलओ’ (BLO) विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळतो. मात्र, कोरपना येथील एका केंद्रावर कार्यरत असलेल्या बीएलओने नियमांना हरताळ फासत अल्पवयीन मुलांची नावे मतदार यादीत घुसवल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार निष्पन्न झाल्याने तहसील प्रशासनाने संबंधित बीएलओला नोटीस बजावत पत्र काढले आहे.
शिक्षण संस्था काय करणार?
सदर बीएलओ हे एका शिक्षण संस्थेत कार्यरत असल्याचे समजते. तहसील प्रशासनाने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू केल्या असल्या तरी, संबंधित शिक्षण संस्था आपल्या या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अशा कर्मचाऱ्याला संस्था पाठीशी घालणार की शिस्तभंगाची कारवाई करणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे इतर बीएलओंचेही धाबे दणाणले आहेत. आता या प्रकरणाचा तपास नेमका कोणापर्यंत पोहोचतो आणि दोषींवर प्रत्यक्ष काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.







