खळबळजनक! कोरपना तहसीलदारांचा दणका; ‘त्या’ शिक्षकावर प्रशासकीय कारवाईचे आदेश!
मतदार यादीत अल्पवयीन मुलांची नावे घुसडल्याचा प्रकार; ‘बीएलओ’ मन्ने यांचा खुलासा फेटाळला
कोरपना: लोकशाहीचा सर्वात पवित्र दस्तऐवज असलेल्या ‘मतदार यादी’मध्ये फेरफार करून अल्पवयीन मुलांची नावे नोंदवण्याचा गंभीर प्रकार कोरपना येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शिक्षक श्री. मन्ने यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, कोरपना यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरातील नागरिकांनी १४ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या तक्रारीनुसार, श्री. मन्ने यांनी जाणीवपूर्वक दोन अल्पवयीन मुलांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली:
👉 प्रकरण १: ओमकार पांडुरंग वरभे यांची आधार कार्डवरील जन्मतारीख ०८/०१/२००८ (वय १६ वर्षे) असताना, फॉर्ममध्ये ती ०८/०१/२००२ दाखवून १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच नाव नोंदवले.
👉 प्रकरण २: प्रारुल श्रीकृष्ण कोडापे यांची जन्मतारीख ३०/०३/२००८ असताना, कागदोपत्री ती ३०/०३/२००२ अशी नोंदवून त्यांनाही मतदार बनवले.
’धोटे’ नामक व्यक्तीची चर्चा आणि राजकीय कनेक्शन: परिसरात अशी जोरदार चर्चा आहे की, बीएलओ मन्ने यांनी आपली शासकीय आयडी धोटे नामक एका खाजगी व्यक्तीला वापरण्यास दिली होती. इतकेच नव्हे तर, एका बड्या राजकीय नेत्याने स्वतःच्या ‘व्होट बँके’च्या स्वार्थासाठी बीएलओकडून हे कृत्य करून घेतल्याची चर्चाही तालुक्यात रंगली आहे.
“जर मतदार नोंदणीवेळी मतदारांचे वय १६ असताना १८ दाखवले गेले, तेव्हा संबंधित निवडणूक अधिकारी काय करत होते? की ते झोपले होते?” असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे.
खुलासा ठरला ‘असमाधानकारक’
तहसील कार्यालयाने या प्रकाराबाबत मन्ने यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी “मी माझ्या ॲपवरून हे फॉर्म भरलेच नाहीत” असा पवित्रा घेत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदारांनी हा खुलासा फेटाळून लावला असून, बीएलओ म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट केले आहे.
शासनाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका
तहसीलदारांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, “श्री. मन्ने यांनी कर्तव्यात कसूर करून शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन केली आहे.” या कृत्यामुळे आता त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असून, संवर्ग विकास अधिकारी (BDO) पंचायत समिती कोरपना यांना तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे ही बीएलओची जबाबदारी असते. वयाची अट पूर्ण नसतानाही खोटी माहिती भरून नाव नोंदवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.”
—तक्रारदार नागरिकांची भावना
आता पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी या शिक्षकावर कोणती शिस्तभंगविषयक कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे इतर बीएलओ आणि कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.






