कोरपण्यात राष्ट्रीयकृत बँकेसाठी भाजपचा पुढाकार; आमदार भोंगळे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाचे आश्वासन
कोरपना: कोरपना हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असूनही येथे एकही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमोल आसेकर यांनी आमदार देवराव दादा भोंगळे यांच्याकडे कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर आमदारांनी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून लवकरच बँकेची शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
कोरपना शहर हे तेलंगणा राज्य, यवतमाळ जिल्हा आणि जिवती तालुक्याच्या सीमेवरील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ आहे.
शहरात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, मोठ्या शैक्षणिक संस्था आणि आरोग्य केंद्रे आहेत. मात्र, तरीही राष्ट्रीयकृत बँकेचा अभाव ही मोठी विसंगती ठरत आहे. सध्या नागरिकांना किरकोळ बँकिंग कामांसाठी वनसडी, गडचांदूर, राजुरा किंवा वणी येथे ३०-४० किमीची पायपीट करावी लागते. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे श्रम आणि पैसा वाया जात आहे.
आमदारांचा सकारात्मक प्रतिसाद:
अमोल आसेकर यांनी दिलेल्या निवेदनात कोरपना येथील नागरिकांची होणारी गैरसोय आमदार देवराव भोंगळे यांच्या निदर्शनास आणून दिली. “राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबत आहेत, हे गांभीर्याने घेण्यासारखे आहे,” असे मत आसेकर यांनी व्यक्त केले.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार भोंगळे म्हणाले की, “कोरपना तालुक्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीयकृत बँक असणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयावर मी स्वतः संबंधित वरिष्ठ बँकिंग अधिकारी आणि राज्य स्तरावर पाठपुरावा करून ही मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.”
या आश्वासनामुळे आता कोरपण्यात लवकरच राष्ट्रीयकृत बँकेचे पाऊल पडेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.






