अवैध धंदे जोमात, ठाणेदार मात्र ‘कोमात’; गडचांदूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रहारचा घणाघात
प्रहारचे जिल्हाप्रमुख बिडकर यांचा आरोप; ठाणेदारांच्या मालमत्तेची चौकशी करून बदली करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
गडचांदूर:औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहरात सध्या कायद्याचे राज्य नसून अवैध धंद्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोळसा चोरी, डिझेल तस्करी ते थेट पोलीस स्टेशनच्या गेटवर मिळणारा गुटखा, अशा गंभीर प्रकारांमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. “शहरात अवैध धंदे जोमात आणि पोलीस प्रशासन कोमात” असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख बिडकर यांनी व्यक्त केली असून, ठाणेदारांच्या हलगर्जीपणाविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
तस्करी आणि चोरीचे केंद्र बनले गडचांदूर
गडचांदूर परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आणि वाहतूक व्यवसाय आहे. याचाच फायदा घेत भोयेगावजवळील ढाबे आणि पेट्रोल पंपालगतच्या पंक्चर दुकानांमध्ये अवैध डिझेल विक्रीचा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने शहरात मोठी गर्दी असते मात्र वाहतूक नियंत्रणाकडे पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. यामुळे अपघातांची टांगती तलवार नागरिकांवर असून एखाद्याचा बळी गेल्यावरच पोलीस जागे होणार का? असा सवाल बिडकर यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस स्टेशनच्या गेटवरच मिळतोय ‘मौत’ का सामान
बिडकर यांनी लावलेले आरोप अत्यंत खळबळजनक आहेत. त्यांच्या मते:
व्यसनाधीनता: गांजा, गुटखा आणि सुगंधित तंबाखू थेट पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून विकली जात आहे.
जुगार व सट्टा: सट्टा पट्टी आणि ‘झंडी-मुंडी’ सारखे जुगार ठाणेदारांच्या आशीर्वादाने सुरू असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तस्करी: अवैध मुरूम, गोवंश तस्करी, वाळू उपसा आणि दारू विक्रीला प्रशासनाचे अभय मिळत आहे.
”गडचांदूरचे ठाणेदार कदम हे कर्तव्य बजावण्याऐवजी अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत आहेत. यात त्यांचे मोठे आर्थिक हित दडलेले असून, त्यांच्या गेल्या तीन वर्षांतील संपत्तीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.”
— बिडकर, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष.
तात्काळ बदलीची मागणी
या सर्व प्रकारामुळे गडचांदूरमधील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ठाणेदार कदम यांची तात्काळ बदली करून एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.






