Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित

खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित

कृषी विभागाची मोठी कारवाई

चंद्रपूर: जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्री मध्ये करण्यात येणाऱ्या अनियमितेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे. 24 एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येऊन 12 कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली.

जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली असता, अनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारींच्या आधारे संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुनावणी प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. सुनावणी दरम्यान केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने 16 कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आली. खत विक्रीत किंवा इतर कोणत्याही कृषी निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार करणाऱ्या केंद्र चालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत साठेबाजी आणि खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

👉 परवाने निलंबन झालेले कृषी केंद्र : 1) श्री. ॲग्रो ट्रेडर्स, दुर्गापूर 2) शिव कृषी केंद्र, वरोरा 3) कल्पना कृषी केंद्र, वरोरा 4) आदर्श कृषी केंद्र, जिबगाव (सावली) 5) धाईत कृषी केंद्र, निफंद्रा (सावली) 6) साई कृषी केंद्र, सावली 7) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, गिरगाव (नागभीड) 8) देशमुख कृषी केंद्र, मांगली (नागभीड) 9) सेवा सहकारी संस्था, पळसगाव (नागभीड) 10) प्रभु कृपा कृषी केंद्र, मेंढा (नागभीड) 11) ठेंगरे कृषी केंद्र, पिंपळगाव (ब्रम्हपुरी) 12) विनोद कृषी केंद्र, पिंपळगाव (ब्रम्हपुरी) 13) पवन कृषी केंद्र, भद्रावती 14) समर्थ ॲग्रो एजन्सी, गवराळा (भद्रावती) 15) पाथरी सेवा सहकारी संस्था, पाथरी (सावली) 16) गणेश कृषी केंद्र, बेंबाळ (मुल) या कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर 1) तिरुमला ॲग्रो एजन्सी, कोरपना 2) सेवा सहकारी संस्था, गेवरा बुज (सावली) 3) कास्तकार कृषी केंद्र, व्याहाड खु. (सावली) या कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

Popular Articles