मार्च एंडिंगचा फटका शेतकऱ्यांना का? आमदारांनी थेट बँकेत जाऊन मॅनेजरला सुनावले ‘खडे बोल’.
बँकेचे व्यवहार वेळेआधीच गुंडाळले; आमदार देवराव भोंगळे यांनी शाखा व्यवस्थापकाला धरले धारेवर!
कोरपना: मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा. या काळात शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांची बँकेत मोठी गर्दी असते. मात्र, याच काळात आपली जबाबदारी झटकून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोरपना शाखेने वेळेपूर्वीच व्यवहार बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची तक्रार मिळताच आमदार देवराव भोंगळे यांनी थेट बँकेत धाव घेत शाखा व्यवस्थापक वासनिक यांना चांगलेच सुनावले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका संतप्त ग्राहकाने आमदार भोंगळे यांना फोन करून बँकेत सुरू असलेल्या गैरप्रकारांची माहिती दिली. मार्च एंडिंगमुळे पीक कर्ज भरण्यासाठी आणि इतर व्यवहारांसाठी शेतकरी रांगेत उभे असताना, बँक प्रशासनाने नियोजित वेळेच्या आधीच खिडक्या बंद केल्या होत्या. तक्रार मिळताच आमदार भोंगळे यांनी तातडीने बँकेत प्रवेश केला आणि व्यवस्थापकांना जाब विचारला.
आमदार बँकेत पोहोचताच उपस्थित ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचला. “कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे आम्ही आमची खाती दुसऱ्या बँकेत हलवली आहेत,” अशी व्यथा अनेकांनी मांडली. यापूर्वीही या बँकेबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांचे फावले होते.
आमदारांचा कारवाईचा इशारा: शेतकऱ्यांची अडवणूक पाहून आमदार भोंगळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. “शेतकऱ्यांच्या कामात अडथळा आणला तर गाठ माझ्याशी आहे,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी आमदार भोंगळे यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, अरुण मडावी, विजय पानघाटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदारांच्या या ‘ऑन द स्पॉट’ कारवाईमुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता वरिष्ठ प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






