बैल बाजारातून परतताना वाद; कोरपना येथे दोन भावांना पाईपने बेदम मारहाण
कोरपना: बैल बाजारातून घरी परतत असताना बैलाने हुलकावणी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन सख्ख्या भावांना लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोरपना पोलीस स्टेशनमध्ये नवाजीश आणि राहील या दोन इसमांविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातलोणी येथील रहिवासी मारोती साईनाथ डाखरे (३३) यांचा लहान भाऊ गोविंदा डाखरे हा १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोरपना येथील बैल बाजारात बैल विकण्यासाठी आला होता. मात्र, बैल न विकल्या गेल्याने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तो बैल घेऊन पुन्हा घरी परतत होता.
कोरपना येथील पोस्ट ऑफिस जवळ रस्त्यावर गोविंदाचा बैल अचानक बुजाडला (घाबरला) आणि त्याने उडी मारली. यावेळी समोरून मोटारसायकलने येणारा नवाजीश हा बैलाच्या भीतीपोटी स्वतःची गाडी घेऊन खाली पडला. या किरकोळ कारणावरून नवाजीशने संतापून गोविंदाला गाठले आणि त्याला डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मदतीला धावलेल्या भावावरही हल्ला
याच दरम्यान मारोती डाखरे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी नवाजीशला मारहाणीचे कारण विचारले असता, तो अधिकच आक्रमक झाला. नवाजीशने तातडीने फोन करून आपला भाऊ राहील याला घटनास्थळी बोलावून घेतले. राहीलने येताना सोबत पी.व्ही.सी पाईपाचा तुकडा आणला होता.
दोन्ही आरोपींनी मारोती यांची पत्नी सुजाता डाखरे यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी राहील याने हातातील पाईपने मारोती यांच्या डोक्यावर आणि डाव्या खांद्यावर जबर प्रहार केला. तसेच मध्ये पडलेला भाऊ गोविंदा याच्या डोक्यावर आणि हाताच्या तळव्यावर पाईपने गंभीर दुखापत केली.
या घटनेनंतर मारोती डाखरे यांनी कोरपना पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी नवाजीश आणि राहील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे) आणि ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करत आहेत.






