Friday, October 16, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच! घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बट्ट्याबोळ; दोषी ठेकेदारावर कारवाई करा

कोरपना स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच! घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बट्ट्याबोळ; दोषी ठेकेदारावर कारवाई करा

​संतप्त नगरसेवकांचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन; सखोल चौकशीची मागणी

​कोरपना: शासनाकडून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कोरपना नगर पंचायत अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता कामांमध्ये प्रचंड अनियमितता आणि अनागोंदी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “कोरपना स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच” उरले असून, प्रत्यक्षात घनकचरा व्यवस्थापन कामाचा पुरता बट्ट्याबोळ उडाला आहे. याप्रकरणी संतप्त नगरसेवकांनी मुख्याधिकारी विशाल वाघ यांना थेट निवेदन देऊन सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

​अटी-शर्ती धाब्यावर; कामे केवळ कागदोपत्रीच!

​नगरसेवकांनी निवेदनात आरोप केला आहे की, संबंधित ठेकेदाराने नगरपंचायतीने घालून दिलेल्या नियमांना, अटी व शर्तींना साफ हरताळ फासला आहे. मंजूर अंदाजपत्रकानुसार कोणतेही काम केले जात नसून, शहरातील स्वच्छता मोहीम केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे विदारक चित्र आहे.

​सध्या पावसाळ्याचे दिवस असतानाही शहरातील अनेक भागांतील नाल्या गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. अनेक वेळा सूचना देऊनही ठेकेदाराचे कर्मचारी नाल्यांची योग्य साफसफाई करत नाहीत. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असून, शहरात ठिकठिकाणी सांडपाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, हिवताप यांसारख्या आजारांची भीती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​कर गोळा करता, मग सुविधा का नाही?

​नगरपंचायतीकडून शहरवासीयांकडून नियमित कर वसूल केला जातो. मात्र, नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधा आणि स्वच्छता सेवा शून्य आहेत. संबंधित ठेकेदार केवळ थातूरमातूर कामे करून कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे भासवत आहे आणि नगरपंचायतीकडून बिलांची उचल करत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर तातडीने चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि शहरातील नाल्यांची तात्काळ साफसफाई करावी, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

​निवेदन देतेवेळी गटनेत्या गीता डोहे, नगरसेवक किशोर बावणे, नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेविका आशा झाडे, नगरसेविका सविता तुमराम तसेच भाजपा शहराध्यक्ष अमोल आसेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

​​”शासनाकडून शहर स्वच्छ व सुंदर राहण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु, घनकचरा व्यवस्थापन कामात मंजूर अंदाजपत्रकानुसार व करारातील अटी-शर्तींनुसार काम होत नसल्यामुळे कोरपना स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच दिसत आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई केली पाहिजे.”

– श्रीमती गीता डोहे (गटनेत्या, नगरपंचायत कोरपना)

Popular Articles

error: Content is protected !!